सततच्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे आरसोली ग्रामस्थ करणार नांगरासकट ट्रॅक्टर द्वारे रास्ता रोको आंदोलन.महावितरण कार्यालयास निवेदन.
भूम (कुणाल लगाडे). तालुक्यातील आरसोली येथील सततच्या खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी उप कार्यकारी अभियंता महावितरण यांना नांगरासकट ट्रॅक्टर द्वारे रास्ता रोको आंदोलन करण्या बाबतचे निवेदन देण्यात आले.मागील दोन महिन्यांपासून गावासाठी व शेतीसाठी होत असलेला वीज पुरवठा दर दहा मिनिटांनी खंडित होत असून याबाबत येथील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात वारंवार संपर्क साधून देखील वीज पुरवठा सुरळीत सुरू होत नसून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात फोन द्वारे माहिती विचारली असता येथील कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.सध्या पावसाने दडी मारल्याने पाण्या अभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत असून सोयाबीन पिकाला पाणी देण्यासोबतच दुभत्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच महावितरण कडून दिवसा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने आरसोली येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे.त्यामुळे महावितरणच्या या गलथान कारभाराला त्रस्त होऊन येथील शेतकरी,नागरिकांनी गुरुवारी महावितरण कार्यालयास निवेदन देऊन दिनांक ६ सप्टेंबर पर्यंत वीज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास येथील ग्रामस्थांच्या वतीने दिनांक ७ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालया समोर नांगरासकट ट्रॅक्टर द्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर गावातील सर्व शेतकरी व नागरिकांच्या सह्या आहेत.