भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
भूम - ( कुणाल लगाडे) शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा सौ संयोगिता ताई गाढवे यांनी रॅली काढून फटाक्यांच्या आतिषबाजी करत कार्यकर्त्यांच्या व शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती सुरेखा कांबळे यांच्या हस्ते ताईंचा यथोचित सन्मान करून ताईंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अलंमप्रभु भूम शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संजय गाढवे यांच्या उपस्थितीत विजयी नगराध्यक्षा व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सन्मान करण्यात आला. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी भूम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख व जबाबदार प्रशासन देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यांनी यावेळी विरोधकांनाही आवाहन करत सांगितले की, भूम शहरात होणाऱ्या विकास कामांना केवळ विरोधासाठी विरोध करू नये. शहराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासकामे पूर्णत्वास न्यावीत. विकासाच्या आड येणारी कोणतीही भूमिका शहराच्या प्रगतीसाठी घातक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल, असे सांगत नगराध्यक्षा गाढवे म्हणाल्या की, नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्राधान्याने सोडवून भूम शहराचा विकास नव्या दिशेने नेण्याचा आमचा मानस आहे. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेचे प्रशासन अधिक कार्यक्षम व उत्तरदायी बनवले जाईल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली भूम शहरात सकारात्मक बदल घडवून आणला जाईल, असा विश्वास यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यासाठी संजय गाढवे, आलमप्रभू शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय सावळे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख उषाताई दराडे, शिवसेना तालुका अध्यक्ष बालाजी गुंजाळ शिवसेना पक्षाचे तसेच विविध पक्षांचे मान्यवर नेते, व्यापारी मंडळी आणि विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचा नूतन नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांना भक्कम पाठिंबा असून, त्यांच्या माध्यमातून भूम शहरासाठी विविध विकासकामे मंजूर करून घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही कामे सध्या प्रगतीपथावर असून काही कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. विरोधकांनी केवळ विरोधासाठी या विकासकामांना अडथळे आणू नयेत, तर भूमनगरीच्या जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासाला गती द्यावी, असे आवाहन यावेळी संजय गाढवे यांनी केले. शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, आलमप्रभू शहर विकास आघाडी व जनशक्ती नगर विकास आघाडीमधून निवडून आलेले वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांनी एकत्रितपणे काम केल्यास भूम शहराचा कायापालट होऊ शकतो. सर्व नगरसेवकांनी पक्षभेद बाजूला ठेवून शहर विकासाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.

