महाशिवरात्री निमित्त मौजे निपाणी येथे कीर्तन सोहळा संपन्न
भूम - (कुणाल लगाडे) मौजे निपाणी येथे महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरासमोर ह.भ.प. मानवीताई महेश ठोंगे (धाराशिवकर) या युवा कीर्तनकार यांचे भावपूर्ण कीर्तन संपन्न झाले. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वकाळात आयोजित या कीर्तनाने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
कीर्तनामध्ये महाशिवरात्रीच्या उपवासाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व, भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलपत्राचे महत्त्व यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले. तसेच तुकाराम महाराज यांच्या “ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान” या अभंगातील ओळींचे भावार्थ स्पष्ट करून समाधान, श्रद्धा आणि भक्ती यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आला.या कीर्तन सोहळ्यात युवा मुलीने टाळकरी म्हणून सुंदर साथ दिली. गायक, मृदंगाचार्य, विणेकरी आदींच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थितहोते.महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या या कीर्तनामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.